डॉ. मनमोहन सिंग आणि १९९१: दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून देश कसा वाचला

रणजीत यादव

१९९१ च्या उन्हाळ्यात भारताकडे फक्त दोन-तीन आठवड्यांची आयात भागेल इतकंच परकीय चलन उरलं होतं. देश कर्जफेड चुकवण्याच्या उंबरठ्यावर उभा होता. याच संकटात एका शांत, मितभाषी अर्थतज्ज्ञाकडे देशाची तिजोरी सोपवली गेली — डॉ. मनमोहन सिंग.

फाळणीतून सुरू झालेला प्रवास

मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अविभाजित पंजाबमधील गाह या गावी झाला. हे गाव आज पाकिस्तानात आहे. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात अमृतसरला आलं. निर्वासित म्हणून नव्याने आयुष्य सुरू करणाऱ्या या मुलाने पुढे पंजाब विद्यापीठ, केंब्रिज आणि ऑक्सफर्डमध्ये अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. केंब्रिजमध्ये त्यांना प्रतिष्ठेचा ॲडम स्मिथ पुरस्कार मिळाला.

त्यांच्या बालपणीचा मोहम्मद अली जिन्नांशी जोडलेला एक रंजक किस्सा आम्ही आमच्या व्हिडिओत सांगितला आहे: मनमोहन सिंगांनी जिन्नाला बॉल का मारला?

अर्थतज्ज्ञ ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर

राजकारणात येण्याआधी त्यांनी मुख्य आर्थिक सल्लागार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (१९८२–८५) आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशी महत्त्वाची पदं भूषवली. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था आतून कशी चालते, हे त्यांना पूर्ण माहीत होतं.

१९९१: सोनं गहाण ठेवण्याची वेळ

जून १९९१ मध्ये पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी त्यांना अर्थमंत्री केलं. परिस्थिती इतकी गंभीर होती की परदेशी कर्ज मिळवण्यासाठी भारताला आपलं सोनं गहाण ठेवावं लागलं होतं. २४ जुलै १९९१ रोजी मनमोहन सिंगांनी ऐतिहासिक अर्थसंकल्प मांडला. परवाना राज कमी करणं, उद्योगांना मोकळीक, आयात शुल्क घटवणं आणि परकीय गुंतवणुकीसाठी दारं उघडणं, असे मोठे बदल त्यात होते. भाषणाच्या शेवटी त्यांनी व्हिक्टर ह्यूगोचं वाक्य उद्धृत केलं: ज्या विचाराची वेळ आली आहे, त्याला जगातली कोणतीही ताकद रोखू शकत नाही.

दहा वर्षे पंतप्रधान

२००४ ते २०१४ अशी सलग दहा वर्षे ते भारताचे पंतप्रधान होते. माहितीचा अधिकार (२००५), ग्रामीण रोजगार हमी योजना (२००५) आणि भारत-अमेरिका अणुकरार (२००८) हे त्यांच्या कार्यकाळातले महत्त्वाचे निर्णय. त्यांच्या कारकिर्दीवर टीकाही झाली, पण त्यांच्या साधेपणावर आणि प्रामाणिकपणावर विरोधकांनीही कधी शंका घेतली नाही. २६ डिसेंबर २०२४ रोजी त्यांचं निधन झालं.

संपूर्ण गोष्ट वाचा

निर्वासित मुलगा ते पंतप्रधान, हा संपूर्ण प्रवास आणि १९९१ च्या सुधारणांची सोपी गोष्ट आमच्या ई-बुकमध्ये वाचा: डॉ. मनमोहन सिंग – ई-बुक (₹४९).

असे आणखी इतिहासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी द मराठी बाणा YouTube चॅनेलला भेट द्या.